पालघर- दिल्लीतील आंदोलकांना पाठिंबा देण्याकरता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला. बोईसर- चिल्हार महामार्गावर नागझरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रास्ता रोको करण्यात आला.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जिल्ह्यातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा-भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद; चर्चा नको, कायदे रद्द करा - शेतकऱ्यांची मागणी
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा-
कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी देशाची राजधानी दिल्लीत एकटवला आहे. अनेक दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांच्या मनात या काद्याविषयी काही शंका आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे, अशी माकपने मागणी केली.
हेही वाचा-गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक
भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहे. शेतकरी विरोधी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून माकपने केली आहे.
शेतकरी आंदोलनाला देशात संमिश्र प्रतिसाद-
शेतकरी आंदोलनाचा आज (मंगळवार) तेरावा दिवस आहे. तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत ही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. चर्चा नको तर कायदे रद्द करा, असा नारा आंदोलकांनी दिला आहे. आज शेतकरी संघटनांनी भारत बंदचा नारा दिला होता. २० पेक्षा जास्त पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. अनके राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.