विरार (पालघर) - वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या 'मॅरॅथॉन स्पर्धे'चा नियोजित मार्ग मागील नऊ वर्षांत पश्चिम पट्ट्यातूनच जात आहे. या स्पर्धा आयोजनात वसई-विरार पूर्व पट्टीचा विचार केला जात नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांत अन्यायाची भावना आहे. त्यामुळे यंदाच्या 'मॅरॅथॉन स्पर्धे'च्या 10व्या आवृत्तीचा मार्ग पूर्व पट्टीतून नेऊन जनभावनांचा आदर राखला जावा, अशी मागणी वसई शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
उपस्थिती - या मागणीनंतरही वसई-विरार महापालिकेने न्यायिक भूमिका घेतली नाही; तर ‘शिवसेना स्टाईल` आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन शिवसेना नालासोपारा विधानसभा उपजिल्हाप्रमुख स्वप्नील बांदेकर, शहरप्रमुख संतोष टेंबवलकर, उत्तम तावडे जितू शिंदे व भरत देवघरे यांच्या उपस्थित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांना शुक्रवारी देण्यात आले.
धावपटूंसोबत स्थानिक प्रतिष्ठित नागरिकही सहभागी - वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘मॅरॅथॉन स्पर्धे`चे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रसिद्ध धावपटूंसोबत स्थानिक प्रतिष्ठित नागरिकही सहभागी होत असतात. यंदा ‘मॅरॅथॉन स्पर्धे`ची 10वी आवृत्ती 11 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी 9 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाइन नाव नोंदणी घेण्यास पालिकेच्या वतीने सुरुवात झालेली आहे.
शिवसेनेच्या वतीने तक्रार - मागील 9 वर्षांत या ‘मॅरॅथॉन स्पर्धे`चा नियोजित मार्ग पश्चिम पट्ट्यातूनच जात आहे. या स्पर्धा आयोजनात वसई-विरार पूर्व पट्टीचा विचार केला जात नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांत अन्यायाची भावना असल्याची तक्रार वसई शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाच्या ‘मॅरॅथॉन स्पर्धे`च्या 10व्या आवृत्तीचा मार्ग पूर्व पट्टीतून नेऊन जनभावनांचा आदर राखला जावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.