पालघर - केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला असून त्याच्या समर्थनार्थ जनजागृतीचे काम एका एनजीओला देण्यात आले आहे. मात्र ही संस्था युवासेनेच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची असल्याची माहिती मिळत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते बंदरासंबंधी जनजागृती करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिकांनी त्यांना पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव परिक्षित पाटील आणि त्यांच्यासह काही पदाधिकारी रात्री वाढवण परिसरात बंदर समर्थनार्थ जनजागृती करण्यास गेले होते. स्थानिकांनी याचा तीव्र विरोध केला. आणि पदाधिकाऱ्यांची गावातून हकालपट्टी केली.
वाढवण बंदर प्रकल्प
केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयाचा डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर तसेच जगातील सर्वोत्कृष्ट 10 बंदरांच्या रचनेत असणार आहे. हे बंदर बनवण्यासाठी 22 मीटर खोल समुद्रामध्ये पाच हजार एकराचा भराव टाकावा लागणार आहे.
बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध
वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोरा, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावं विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उध्वस्त होणार आहे. तसेच पाच हजार एकर समुद्रात भराव टाकण्यात येणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावंच्या गावं समुद्रात बुडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडं, समुद्रातील बीजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता आणि मासेमारीवर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. त्यामुळे वाढवण बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे.
युवासेनीची भूमिका संशयास्पद
मागील दोन ते अडीच दशकांपासून भाजपाकडून डहाणूतील वाढवण येथे जे.एन.पी.टी मार्फत बंदर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्याच भूमिकेवर ठाम राहत उद्धव ठाकरे यांनी देखील या बंदर उभारणी विरोधात स्थानिकांच्या पाठीशी राहणार असल्याचे अनेक वेळा जाहीर केले. वाढवण बंदर समर्थनार्थ जनजागृतीचे काम हे एका एनजीओला देण्यात आले आहे. मात्र ही संस्था युवासेनेच्या राज्य आणि पालघर जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचे कळते. युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव परिक्षित पाटील आणि त्यांच्यासह काही पदाधिकारी रात्री वाढवण परिसरात बंदर समर्थनार्थ जनजागृती करण्यास गेले होते. यावेळी स्थानिकांनी त्यांना तीव्र विरोध करत पिटाळून लावले.
एका बाजूला शिवसेना पक्ष तसेच शिवसेनेचे बडे नेते हे या बंदर विरोधात स्थानिकांच्या पाठीशी असल्याची भूमिका घेतात. मात्र दुसऱ्या बाजूला युवासेना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची वाढवण बंदर समर्थनार्थ जनजागृती करण्याची भूमिका ही स्थानिक नागरिकांना संभ्रमात टाकणारी आहे.