पालघर - वाडा तालुक्यातील ओगदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणारा गारगाई प्रकल्प होत आहे. या धरणातून स्थानिकांना शेती सिंचनासाठी 5 टक्के आणि पिण्यासाठी 5 टक्के असे एकूण 10 टक्के आरक्षित पाणी ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने शहापूर मतदारसंघातील आमदार दौलत दरोडा यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
वाडा तालुक्यातील धरण क्षेत्र भागातील परळी, मांडवा, पीक, वरसाले, गारगाव, मांडवा, मांगरुळ, देवळी आणि डाहे अशा 9 ग्रामपंचायतींना 20 वर्षांचा दृष्टीकोन ठेऊन पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने पारित करावा, अशी मागणी निवदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकतेच या धरण परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ आमदार दौलत दरोडा यांच्यासह जयंत पाटील यांना मंत्रालयात भेटले.
वाडा तालुक्यात ओगदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वाहणाऱ्या गारगाई नदीवर धरण होणार आहे. या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ओगदा परिसरातील 5 गावे ही या प्रकल्पाने विस्थापित होणार आहे. या धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम शासकीय स्तरावरून मुंबई महानगर पालिकेने घेतले आहे. धरण क्षेत्रात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होत असते. डोंगरदऱ्यात स्थिरावलेल्या इथल्या आदिवासी बहुल भागात पाणीटंचाई बरोबरच शेतीसिंचनाचा प्रश्न उद्भवत असतो.
धरण होईल पण आमचीही तहान भागवा आणि शेती सिंचनासाठी पाणी द्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आज मंत्रालयात शहापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांनी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून ही मागणी यावेळी केली आली.
हेही वाचा - सत्तर वर्षांचे झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...