वाडा (पालघर) - जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीत केंद्र सरकारचे वाढवण बंदर होत आहे. मात्र या बंदराला स्थानिक रहिवासी आणि मच्छिमारांचा विरोध आहे. हा विरोध असताना देखील हे बंदर उभारणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचा तीव्र विरोध म्हणून येत्या 15 डिसेंबर 2020 पासून मुंबईतील कफ परेड ते गुजरात सीमेवरील डहाणु -तलसारी भागातील झाई बंदर किनारपट्टीवरील गावे बंदीचा निर्णय मच्छिमारांनी घेतला आहे. या बंदराला मच्छिमार संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.
पालघर जिल्ह्याला 100 किलोमीटरहून अधिक समुद्रकिनारा लाभला आहे. वसई ते झाई या भागात विशिष्ट खडक असल्यामूळे आणि हा मत्स्य बिजोत्पादन निर्मितीचा किनारा आहे. पापलेट, घोळ, बोम्बिल, दाढा, रावस, शिवड या सारखी मासेमारी केली जाते. या किनाऱ्यावरील भाग हा पर्यावरणदृष्टया अतिसंवेदनशील आणि बराचसा भागातील गावे ही पेसा कायदा अंतर्गत येतात. तरी देखील या ठिकाणी मच्छीमारांचा विरोध डावलून हे बंदर उभारणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मच्छिमारांचा विरोध असतानाही कोरोना काळात बंदराबाबत ऑनलाइन जनसुनावणी -
प्रस्तावित वाढवण बंदराबाबत काही आक्षेप/हरकती घेण्यासाठी कोरोना काळात एका शाळेत या बंदराबाबत जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या जनसुनावणीला मच्छिमारांचा आणि स्थानिकांचा विरोध होता. या विरोधाचा भाग म्हणून पालघर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली होती.
तारापूर अणुशक्ती केंद्रास धोका निर्माण होईल -
ज्या भागात वाढवण बंदर उभारले जाते तेथील काही अंतरावर अणुशक्ती केंद्र आहे. राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून हे बंदर उभारणी धोक्याचं असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जातेय. या वाढवण बंदर विरोधातील एकच जिद्द वाढवण बंदर रद्द असे पत्रकही समाज माध्यमांवर फिरवले जात आहे. एकंदरीत या केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला आता गाव बंदीच्या इशाऱ्याने तीव्र विरोध होऊ लागला आहे.