पालघर : बेकायदा मद्य वाहतूकीवर कारवाईसाठी गेलेल्या डहाणू उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या वाहनावर मद्य तस्करांनी हल्ला ( Liquor Smuggler Attack ) केला. या अपघाती हल्ल्यात पथकातील कर्मचारी व पंच यांना गंभीर दुखापत झाली आहे. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उधवा-तलासरी रस्त्यावर गावीतपाडा भागात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मद्य तस्करांनी हा हल्ला ( Dahanu Excise Department Team ) केला.
पिकअप टेम्पोतून बेकायदा वाहतूक : डहाणू भरारी पथकाकडे जव्हार, मोखाडा, तलासरी विक्रमगड, वाडा तालुक्यांमध्ये बेकायदा मद्य वाहतूक विक्री प्रतिबंध व विभागाशी निगडित इतर संबंधित कामे आहेत. महाराष्ट्र गुजरात राज्य सीमेलगत या भरारी पथकाची नेहमीच गस्ती सुरू असते. शुल्क निरीक्षक धनशेट्टी यांना उधवा तलासरी रस्ता मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला परराज्यातील मोठा मद्यसाठा सायमन विष्णू काचरा (रा. आमगाव- तलासरी), विक्रम दीपक राऊत व विनायक कमलाकर बारी (दोन्ही रा. धाकटी डहाणु) या मद्य तस्करांमार्फत पिकअप टेम्पोतून बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली. त्यानुसार धनशेट्टी यांनी भरारी पथकाचे जवान कमलेश सानप, प्रधान राठोड यांच्यासह कारवाई कामी लागणारे पंच विनायक घाडगे व दत्ता लोखंडे यांना कारवाईसाठी सरकारी पोलीस वाहनात सोबत घेतले.
पथकाला आढळले : गस्ती करीत असताना संशय असलेले पांढऱ्या रंगाचे दोन पिकअप टेम्पो कुर्झे गावीतपाडा परिसरातील रस्त्यावर पथकाला आढळले. या दोन वाहनांपैकी एका टेम्पोमध्ये बेकायदा मद्यसाठा होता. हे लक्षात येताच भरारी पथकाने टेम्पोच्या दिशेने त्यांना रोखण्यासाठी व कारवाई करण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी पिकअप चालक भरधाव वेग घेऊन पथकाला चकवा देत होता. पथकाने दोन्ही पिकअपचा पाठलाग करुन पिकअप थांबविण्याचा प्रयत्न केला असता, मद्य तस्कर चालकाने भरारी पथकाच्या वाहनासमोर पिकअप टेम्पो अडथळा करून जोरदार ठोकर दिली व अपघाती हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर भरारी पथकाचे अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला असलेला एका खड्ड्यासदृश्य दरीत कोसळली. या हल्ल्यात पथकातील जवान कमलेश सानप यांच्या पायाला तर पंच विनायक घाडगे यांच्या हाताला गंभिर दुखापत झाली आहे.मद्यसाठ्याने भरलेल्या पिकअप टेम्पोसह इतर एक टेम्पो व तिन्ही मद्य तस्कर या घटनेनंतर फरार झाले.
पोलीस ठाण्यात हल्ल्याच्या घटनेची तक्रार : उत्पादन शुल्क निरीक्षक महेश धनशेट्टी यांनी तलासरी पोलीस ठाण्यात हल्ल्याच्या घटनेची तक्रार नोंद केली आहे. तिन्ही सराईत मद्य तस्करांवर पोलिसांनी गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. फरार झालेल्या तिघांचाही शोध सुरू असल्याचे तलासरी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी म्हटले आहे.