पालघर - माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव वाडा येथील निवास्थानी आज आणण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.
सावरा हे निर्मळ स्वभावाचे होते, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्यामुळे कधीच सभागृहाचे कामकाज बंद झाले नाही. मंत्री नसल्याने सभागृहाचे कामकाज बंद व्हायचे, पण मंत्री विष्णू सावरा हे कायम सभागृहात उपस्थित असायचे, अशी आठवण फडणवीसांनी शेअर केली.
राष्ट्रवादाच्या विचारांशी तडजोड केली नाही
संघ आणि भाजपात काम करत असताना सावरा यांनी राष्ट्रवादाचा विचार कायम टिकवला आणि त्यापासून कधीच फारकत घेतली नाही. त्यांनी संघर्षात लठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. पण विचारांशी तडजोड केली नाही, असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आज माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या जाण्याने पालघर जिल्हा पोरका झाल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले. श्रद्धांजली वाहताना त्यांना गहिवरून आले होते.
बँकेतील नोकरी सोडून भाजपासाठी कामाला सुरुवात
1980 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र याहीवेळेस त्यांचा पराभव झाला. सलग दोनवेळा पराभव होऊन देखील, पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र यावेळी ते विजयी झाले.
1990 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी ते वाडा विधानसभा आणि भिवंडी ग्रामीण आणि विक्रमगड विधानसभा मतदार संघ असे एकूण 6 वेळा लोकप्रतिनिधित्व केले आहे. युतीच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात PESA कायदा राज्यात लागू केला.