पालघर- जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांची मोठी समस्या असून या स्थलांतरामुळे कुपोषण, शाळाबाह्य विद्यार्थी अशा समस्या निर्माण होत आहेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न लवकर सुटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे. आदिवासी विकासमंत्री आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आले होते.
जिल्ह्यातील विविध योजनांचा, विभागांचा आढावा घेण्यासाठी पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, विनोद निकोले, आदिवासी विभाग ठाणे अप्पर आयुक्त संजय मीना, डहाणू आणि जव्हार प्रकल्प अधिकारी प्रजित नायर, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खावटी योजनेचा लाभ जिल्ह्यातील कातकरी आदिवासींना मिळावा यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करुन वंचित राहिलेल्या प्रत्येकाला तातडीने रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना के.सी.पाडवी यांनी यावेळी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी मत्स्यशेती, शेळीपालन, वंदन गट तयार करून शेती संबंधित उपक्रम इ.संकल्पना यावेळी आदिवासी विभागामार्फत मांडण्यात आल्या आणि त्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
कुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्यातील स्थिती जाणून घेताना अतितीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित बालके, अमृत आहार योजना इत्यादीबद्दल जाणून घेऊन कुपोषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता घेतील, यावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. आदिवासींसाठी योजना राबवताना निधी कमी पडू देणार नसल्याचे तसेच आदिवासी समाजासाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करुन आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी के.सी.पाडवी यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा देखील आढावा घेण्यात आला.