पालघर/वसई - वसई-विरार शहरात वीजचोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत अवघ्या दहा दिवसात ६ हजार २८५ वीज जोडण्यांची तपासणी केली असता त्यात ३८१ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. वीजचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसू लागला आहे. एकीकडे सातत्याने येणारी वाढीव वीजबिले यामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे. तर दुसरीकडे वीजचोरी करणारे मात्र मोकाट फिरत आहेत. याबाबत ग्राहकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या.
महावितरणच्या विशेष पथकाची कारवाई
मीटरमध्ये फेरफार करून, मुख्य वीज जोडणीच्या सर्व्हिस वाहिनीला टॅपिंग करून वीजचोरी केली जाते. तसेच छुप्या मार्गाने आकडे टाकूनदेखील मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही भागात बेकायदेशीर चाळी व बांधण्यात आलेल्या घरांना काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक लाभासाठी वीजजोडण्या दिल्या आहेत. त्याचाही आर्थिक फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे अशा वीज चोरांना लगाम घालण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. ९ डिसेंबरपासून यासाठी विशेष पथके तयार करून तयार करून विविध ठिकाणी धाड सत्र सुरू केले आहे. या कारवाईदरम्यान वसई विभागातील आचोळे, विरार पूर्व,पश्चिम, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम, वसई रोड पूर्व व पश्चिम, वसई शहर तसेच वाडा उपविभाग अशा एकूण ६ हजार २८५ वीजजोडण्या तपासण्यात आल्या. यात ४ हजार ८४६ घरगुती, १ हजार २६६ व्यावसायिक, १३२ औद्योगिक व ४१ इतर वीज जोडण्यांचा समावेश आहे.
३० लाख ९१ हजार रुपयांची वीजचोरी
तपासणी करतेवेळी ३८१ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सुमारे २ लाख ५८ हजार ३८४ युनिटची म्हणजेच जवळपास ३० लाख ९१ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांना वीजचोरीचे देयक देण्यात आले असून हे देयक भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वीजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
वीजचोरी प्रकरणी गुन्हे दाखल
नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी व आचोळे परिसरात वीजचोरी होत असल्याचा प्रकार कारवाई दरम्यान समोर आला आहे. मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने वीज चोरी केली जात होती. आतापर्यंत जवळपास ८ हजार २२९ युनिट म्हणजेच ९० हजार १५० रुपये इतक्या रकमेची वीजचोरी केली होती. या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांनी दिली आहे.