पालघर/वसई - वसईत बाप्पाचे विसर्जन करताना चक्क तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकूटसुद्धा विसर्जन केल्याची घटना घडली आहे. ही बाब लक्षात येताच पट्टीच्या पोहणाऱ्याने तब्बल पाऊण तासानंतर मुकूट तलावातून शोधून काढला आहे.
हेही वाचा - मुंबईत सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार बाप्पाचे विसर्जन
- वसईमधील उमेळमान गावातील प्रकार -
वसईत उमेळमान गावातील शिवसेनेचे पालघर जिल्हा सचिव विवेक पाटील यांच्याकडे गेली चाळीस वर्षे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना भाद्रपद महिन्यात होत असते. पाटील यांचे भाऊ हरीश पाटील यांनी 1997 साली घरच्या बाप्पाला साडे पाच तोळ्याचा जवळपास तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकूट बनवला होता. दरवर्षी भाद्रपदात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर हा मुकूट बाप्पाच्या डोक्यावर घालण्यात येत असे. तसेच विसर्जनाच्यावेळी तो पुन्हा काढून ठेवला जातो. मात्र, यावर्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पाटील कुटुंबातील संजय पाटील (वय वर्ष 50) यांना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. त्यामुळे पाटील कुटुंबांना सुतक लागू झाले. सुतकात गणेश मूर्ती घरी कशी ठेवायची म्हणून गावकऱ्यांनी निर्णय घेत शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान विवेक पाटील यांच्या घरातील गणेशाची मूर्ती घराजवळील तलावात विसर्जन केली. मात्र, या घाईगडबडीत गणेशाच्या मूर्तीला घातलेला सोन्याचा मुकूट मात्र काढण्यास सगळे विसरले. रात्री उशिरा घरची पुरुष मंडळी आल्यानंतर गणेशाचा मुकूट देखील मूर्तीसोबत तलावात विसर्जन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
- पाऊण तासात शोधला मुकूट -
रविवारी या तलावात मुकूटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. यादरम्यान विवेक पाटील यांनी पाणजू येथील मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरवले. विरार येथील पट्टीचे पोहणारे सदानंद भोईर हे त्यांच्याच गावातील एका नातलगाकडे आल्याची माहिती त्यांना मिळाली. लागलीच त्यांनी सदानंद यांच्याशी संपर्क साधत तलावातील मुकूट शोधून देण्याची विनंती केली. भोईर यांनीही तलावातील पाण्यात जवळपास पाऊण तास शोध घेतल्यानंतर पाटील कुटुंबीयांच्या गणपतीचा मुकूट शोधून काढला.
- साडेपाच तोळ्याचा सोन्याच्या होता मुकूट -
तलावातील 16 फूट पाणी, दीड फूट गाळ व दीड दिवसांचे तब्बल 96 गणेशमूर्तींचे विसर्जन झालेले असतानाही, त्यांनी अचूकपणे पाटील कुटुंबांचा गणपती व त्यावरील असलेला मुकूट पाण्यातून शोधून वर आणला. गणेशाच्या सोबत विसर्जन झालेला सोन्याचा मुकूट जवळपास सोळा तासानंतर पुन्हा पाटील कुटुंबियांच्या हाती मिळाल्यामुळे बाप्पानेच रिटर्न गिफ्ट दिल्याची भावना पाटील कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. तलावातील गाळात रुतलेली एखादी वस्तू पुन्हा मिळण्याची शाश्वती नसतानाही ती पुन्हा गणेशाच्या कृपाशीर्वादाने मिळाले असल्याची भावना विवेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - बोईसरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग