पालघर - लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासनाने परराज्यातील कामगारांना आणि मजुरांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र, असे असले तरी या कामगारांची आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. याचा फायदा वाहनचालक घेताना दिसत आहेत. गावी परतण्यासाठी या कामगारांकडून दामदुप्पट भाडे उकळून त्यांची ट्रकमधून अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे.
पालघर येथून उत्तरप्रदेशच्या कामगारांना विनापरवाना घेऊन जाणारे ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पालघरमध्ये नाका-बंदी दरम्यान दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या दोन ट्रकमध्ये जवळपास १०० कामगार, महिला, लहान मुले यांना गर्दी करुन बसवण्यात आले होते. त्यांच्या कडून गावी जाण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये घेण्यात आले. पालघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी या मजुरांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले.
गावी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध असून अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचे आवाहन पोलिसांनी या मजूरांना केले आहे. मजूरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन ट्रक चालक आणि दलालांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.