पालघर - तंबाखूजन्य पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत तलासरी पोलिसांनी 14 लाख 68 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अच्छाड चेकपोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान संबंधित कारवाई करण्यात आली. नाकाबंदी चालू असताना पोलिसांनी एका पिकअप गाडीची झडती घेतली. यावेळी महाराष्ट्रातात प्रतिबंधीत असलेले तंबाखूजन्य पदार्थ आढळले.
पोलिसांनी संबंधित मालाची वाहतूक करणारी पिकअप गाडी तसेच तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 14 लाख 68 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी दिपक चंद्रिका प्रसाद (वय-23) व प्रदीप हरिशंकर जयस्वाल (वय-28) या दोघांना अटक केली आहे. आरोपीं विरोधात तलासरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं कलम 328, 188, 272, 273 34, सह मो.व.का.क 3(1)/177 तसेच अन्नसुरक्षा कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.