पालघर - जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात उधवा येथे 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. सिल्वासा येथील विदेशी मद्य इनोव्हा कारमधून तलासरी तालुक्यातील उधवा येथे पकडण्यात आले. कारमध्ये विदेशी मद्याचे 44 बॉक्स होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
तलासरी तालुक्यातील उधवा येथे इनोव्हा कारमधून अवैद्य मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे 44 बॉक्स अवैध विदेशी मद्य आणि अंदाजे 12 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार गुजरात, सुरत व अंधेरी येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे अवैध मद्य मुंबई येथे कोणत्या ठिकाणी जाणार होते? या प्रकरणात कोण सामील आहेत? याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 76 वाहने जप्त केले असून 298 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मद्य, काळागुळ, गावठी हातभट्टी दारू, ताडी, परदेशी मद्य असा एकूण 5 कोटी 89 लाख किमंतीचा मुद्देमाल आजवर जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली आहे.