पालघर - हैदराबाद येथील सोने व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद वसीम अब्दुल माबद खान (वय 32) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने हैदराबादच्या व्यापाऱ्याला मुंबईत 39 लाख रुपये किमतीच्या खोट्या सोन्याची विक्री केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ही कारवाई केली.
हैदराबाद येथील सोने व्यापारी पवनकुमार नलामोथु साईबाबा नायडू यांना आरोपी व त्याच्या साथीदारांनी फोनवर संपर्क केला. त्यांना कमी किमतीत 1 किलो सोने देतो, असे सांगत मुंबईत बोलवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी त्यांना बनावट सोने देऊन त्यांच्याकडून 39 लाख रुपये उकळले. आपली फरवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जंगलातून आरोपी अटक -
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहम्मद हा फरार झाला. विक्रमगड तालुक्यातील तलवाडा-धोडीपाडा येथे एक व्यक्ती संशयितरित्या जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोप असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी मोहम्मदचे साथीदार फरार आहेत.