पालघर : गेली दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसई पूर्वेची तानसा नदी तुडूंब भरली. तर आता नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. दमदार बरसत असलेल्या पावसामुळे मेढे गावातील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावात जाण्यासाठी हा पूल हा एकमेव मार्ग आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूराची भीती गावकरी व्यक्त करत आहेत
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. मेढे गावातील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. भाताने, नवसइ, थळ्याचापाडा, आडणई, जाभुलपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा अशी संपर्क तुटलेल्या १२ गावांची नावे आहेत. या गावांत जाण्यासाठी हा पूल हा एकमेव मार्ग आहे. प्रशासनाने या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून येथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वसई तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 196 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मांडवी येथे 132 मिलिमीटर, आगाशी 205 मिलिमीटर, निर्मल 234 मिलिमीटर, तर विरार 214 मिलिमीटर, मणिपूरमध्ये 168 मिलिमीटर, वसईमध्ये 218 मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी 24 तासात 196 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली होती. मुख्य शहरी भागात पावसाच्या सरींचे प्रमाण कमी झाले होते. मात्र हवामान विभागाने मुंबईसह पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे.