पालघर - मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १९५.४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३४२ मिमी पाऊस वसई तालुक्यात झाला आहे. यामुळे वसई, नालासोपारा आणि विरार येथे अनेक भागात पाणी साचले आहे.
पावसामुळे वसंतनगरी, मिठाघर, नवघर ईस्ट, तुळींज-आचोळा रोड, जुने विवा कॉलेज, विरार वेस्ट या भागात पाणी साचले आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही नवघर मिठागर परिसरात समुद्रात आलेल्या भरतीमुळे पूरस्थिती आहे. या ठिकाणाहून अग्निशनम दलाने एक रुग्णाला सुखरूप बाहेर काढले असून, डॉक्टरांच्या एका पथकानेही या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची तपासणी केली आहे.
नालासोपारा येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल नालासोपारा-विरार सेवा ठप्प होती, आता ही सेवा सुरू झाली असून लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गरज असेल तरच नागरिकांनी घरातून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात मागील २४ तासात झालेला पाऊस
- वसई - ३४२ मिमी
- पालघर- २४८.८३ मिमी
- वाडा- १२५.९४ मिमी
- डहाणू- १६२.५५ मिमी
- जव्हार- ७२.८८ मिमी
- मोखाडा- ५०.७५ मिमी
- विक्रमगड- १४२.७५ मिमी
- तलासरी- १३६.२५ मिमी