पालघर - जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात पावसाने कालपासून उग्ररुप धारण केल्यामुळे मोखाडा- त्र्यंबकेश्वर या मुख्य रस्त्यावरील मोरचोंडी येथील नदीला पूर आला आहे. यापुरात हा रस्ताच वाहून गेल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मोरचोंडी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी परिसरात पाणी साचले आहे. तर आसपासच्या घरात पाणी घुसल्याने येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ही घटना पहाटे ६:३० वाजताच्या सुमारास घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तर मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे मोखाडा-त्र्यंबक रस्त्यावरील मोरचुंडी येथील पुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे.
यामुळे बस वाहतूक कोलमडून रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे नाशिक आणि मोखाड्याचा संपर्क तुटला आहे. तर तोंरगण घाटात झाडे तुटल्याने रस्ता बंद झाला आहे. खोडाळा-मोखाडा रस्त्यावरील गांधीपुल मंदिराजवळही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.
आतापर्यंत कोणतीही सरकारी यंत्रणा याठिकाणी पोहचली नसल्याने आशर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते दयानंद भुसारा, रफीक मणियार, भाजपाचे नेते विठ्ठल चोथे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.