पालघर - जिल्हा परिषद पालघर आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने बालदिनानिमित्त जव्हार येथील बाल संजीवन छावणीत महाआरोग्य तपासणी शिबीर पार पडले. सिनेअभिनेते शिवाजी साटम यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील कुपोषित बालकांसह मातांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.
हेही वाचा - नेहरु जयंतीनिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती रॅली
श्री विठु माउली ट्रस्ट आणि विवेक पंडित श्रमजीवी संघटना यांनी गेले 3 वर्षे जव्हार मोखाड्यातील कुपोषणग्रस्त भागात कुपोषण आणि दारिद्र्य निर्मूलन अभियान सुरू केले आहे. मागील वर्षी विठु माउली ट्रस्टने जव्हार येथे एक भव्यदिव्य असे बाल उपचार आणि आहार केंद्र बाल संजीवन छावणी या नावाने उभारले आहे. या छावणीत 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती आणि बालदिनानिमित्त श्री विठु माउली ट्रस्ट, हिंदुजा हॉस्पिटल आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर राबवण्यात आले. यावेळी तपासणीमध्ये टी बी, सेरेब्रल पालसी, दमा, त्वचा रोगांसह, गतीमंदत्व असे गंभीर आजार असलेले रुग्ण या शिबिरात आले होते. तसेच कुपोषित बालकांना आवश्यक ते उपचार आणि आहार देण्याचे काम बाल संजीवन छावणी आणि हिंदुजा रुग्णालयाच्या समन्वयाने होणार आहे.
हेही वाचा - पालघरातील गणेश कुंड येथे दीपोत्सवानिमित्त आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी
महाआरोग्य शिबिराप्रसंगी श्री विठु माऊली ट्रस्ट अध्यक्ष विवेक पंडित, खासदार राजेंद्र गावित, उद्योजग झुबेन गांधी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पालघर जिल्हा परिषदेचे डॉक्टर आणि अधिकारी कर्मचारी तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.