पालघर - महाराष्ट्र गुजरात ( Maharashtra Gujrat Border Dispute ) सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायतीनंतर शेजारच्या झाई गावच्या जमिनीवर गुजरात राज्याने अतिक्रमण केल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला. त्याधर्तीवर पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ( Collector Govind Bodke ) यांनी बुधवारी सीमा भागातील ( Gujrat Border Area ) या दोन्ही गावांना भेट दिली. यावेळी दोन्हीकडे शांतता असली, तरी हद्दनिश्चिती करण्याची सल स्थानिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात ( Winter Session ) हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घरे रिकामी करण्याची झाईतील नागरिकांना नोटीस तलासरी तालुक्यातील वेवजीनंतर झाई गावातूनही गुजरात राज्याने ( Gujarat State Encroachment On Maharashtra Village ) गावच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायतीने आपल्या जागेवर घरे बांधल्याचे सांगून, २०२० साली घरे रिकामी करण्याची नोटीस ( Gujrat State Send Notice To People ) झाईतील काही ग्रामस्थांना दिली. मात्र कायमचे रहिवासी असून महाराष्ट्राच्या जमिनीवर गुजरातनेच अतिक्रमण केल्याचा दावा आता या ग्रामस्थांनी केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा चिघळल्याने या प्रकाराला धार आली आहे. त्याची दखल घेत, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ( Collector Govind Bodke ) यांनी झाई गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी पूर्वीच्या गावच्या हद्दीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन अतिक्रमण झाल्याचा मुद्दा त्यांना सांगितला.
भुमी अभिलेख मोजणी गुजरातकडून अमान्य जिल्हाधिकारी बोडके यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, महसूल आणि भुमी अभिलेख विभागाला या जमिनीची पूर्वीची कागदपत्रे व नकाशा गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर वेवजी गावातील जमिनीवर गुजरातच्या ( Gujarat State Encroachment On Maharashtra Village ) सोलसुंभा ग्रामपंचायतीने केलेल्या अतिक्रमण भागात त्यांनी भेट दिली. यावेळी वेवजीचे उपसरपंच अनंत खुलात, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तलासरीतील भुमी अभिलेख विभागाने यावर्षी मे महिन्यात मोजणी केली होती. मात्र उंबरगाव तहसीलदारांनी त्यावर हरकत घेत, दोन्ही राज्य पातळीवर हा मुद्दा सोडवण्याचे सांगून मोजणी अमान्य केली.
हिवाळी अधिवेशनात गाजणार मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. हद्द निश्चिती करण्याची मागणी स्थानिकांची आहे. मात्र सीमा भागात संघर्ष अथवा तणावाचे वातावरण नाही. या भेटीदरम्यान तलासरीचे तहसीलदार श्रीधर गालीपिल्ली गटविकास अधिकारी वैभव सापळे, भुमी अभिलेख तसेच अन्य विभागाचे अधिकारी होते. या दोन्ही गावच्या विवादित भागातील जमिनीची कागदपत्रे व नकाशा गोळा करण्याची लगीन घाई सुरू झाली आहे. लवकरच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने हद्द निश्चितीच्या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही ग्रामस्थांकडून गुजरात राज्याने अतिक्रमण केल्याचा दावा असल्याने प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेत हद्द निश्चितीची मागणी करणारा ठराव मांडला जाईल अशी माहिती झाई ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली आहे.