पालघर - लॉकडाऊन काळात धान्य वाटप करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना चोर आल्याच्या अफवेने समाज कंटाकांकडून मारहाण केली. तसेच त्यांच्या मदतीसाठी आलेल्या कासा पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. डहाणू तालुक्यातील सारणी येथे ही घटना घडली.
डहाणू तालुक्यातील सारणी व आजुबाजूच्या गावात काही दिवसांपासून चोरटे फिरत असल्याच्या अफवेमुळे एकूणच भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री गरजू लोकांना धान्य वाटप करून सामाजिक कार्यकर्ते माघारी परतत होते. हे सर्व सारणी पाटीलपाडा येथे येताच चोर आल्याचे समजून त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली. तसेच पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्यांनी कासा पोलिसांची मदत मागवली. मात्र, पोलिसांची गाडी येताच काही समाज कंटकांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करत त्यांनाही पुढेे जाण्यास मज्जाव केला. समाज कंटकांनी केलेल्या दगडफेकीत दोन अधिकारी व दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
संबंधित घटनेचा योग्य तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आनंदराव काळे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.