पालघर - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव वाढत असून त्याची दखल घेत शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, आरोग्याची मोठी जबाबदारी सफाई कामगारांवर असून त्यांच्या आरोग्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केला आहे.
सफाई कामगारही माणसेच आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सफाई कामगारांना पुरेसे संरक्षक मास्क, सायनिटायझर्स आणि अन्य तपासण्या वारंवार करुन दिल्यावरच ते काम करतील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
वसई-विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर आणि भिवंडी महानगरपालिका तसेच इतर महापालिका आयुक्तांकडे पंडीत यांनी संबंधित मागण्या केल्या आहेत. पालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. अन्यथा कामगार रस्त्यावर येतील, असा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेने दिला आहे.