पालघर - पालघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या चारही पोलिसांचा दुसरा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या त्यांना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील उमरोळी येथील आरोपीस पालघर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर या आरोपाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपीची कोरोना तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात समोर आले होते. या कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 18 पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. यात 14 पोलिसांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यापैकी चार पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. चौघेही कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.