पालघर - सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण मुलं काळ मांडवी धबधब्यात पडले. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी तीन मुलं पाण्यात उतरली. मात्र, दुर्दैवाने पाचही मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही मुलं जव्हारमधील अंबिका चौक येथील आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार शहरातील अंबिका चौक येथील काही तरुण मुलं जव्हारपासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या काळ मांडवी धबधब्यावर फिरायला गेले होते. यातील दोन जण सेल्फी घेण्याच्या नादात पाण्यात पडले. या दोघांना वाचवण्यासाठी आणखी तीन जण पाण्यात उतरले. मात्र त्यांनाही पाण्याचा आणि डोहाच्या खोलीचा अंदाज आला नाही. यात पाचही जण पाण्यात बुडाले.
देवेद्र गंगाधर वाघ (वय. 28), प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय. 20), देवेंद्र दत्तात्रय फलटनकर (वय. 19), निमेश नरेश पटेल (वय. 28) रिंकू अतुल भोईर (वय. 22) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, मुलांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने काढण्यात आले असून ते शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - वसई, विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणांचा पाणीसाठा खालावला
हेही वाचा - नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक