पालघर- जिल्ह्यातील प्रारूप किनारा व्यवस्थापन आराखड्यावरील (CRZ) जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे. ही सुनावणी 30 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील किनारपट्टी भागात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑनलाइन पद्धतीने सुनावणी करण्याची कायद्यात कुठेही तरतूद नसताना आराखड्यावर कमीत कमी आक्षेप नोंदवण्याचा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार प्रदान करण्यात आल्याचे केंद्र व राज्यशासन एके ठिकाणी सांगत असताना ग्रामसभांनी विरोधातील एकमताने घेतलेल्या ठरावाला न जुमानता वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदी सारखे प्रकल्प लादले जात असून बुलेट ट्रेनसाठी पोलीस बळाचा वापर करीत जबरदस्तीने जमीन सर्वेक्षण आणि भरपाईची प्रक्रिया राबवली जात आहे. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसूनवाई ही ऑनलाइन घेण्याची कायद्यात कुठेही तरतूद नसून ऑनलाइन पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाला आपला आक्षेप नोंदविण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेला जिल्हा असून ह्या भागात नेहमीच मोबाईल नेटवर्क ची मोठी समस्या असते. त्यामुळे जनसूनवाई दरम्यान मोबाईल नेटवर्क निघून गेल्यास अनेक घटकांना मोठ्या प्रमाणात आपले आक्षेप नोंदविण्या पासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच कमी कालावधीत प्रत्येकाला आपला आक्षेप नोंदविण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच ज्या नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही अशा व्यक्तींना आक्षेप नोंदविता येणार नाहीत. बाहेरील व्यक्ती यात सहभाग घेत वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून संविधानाने आम्हाला दिलेल्या नागरी अधिकारांचा भंग करणाऱ्या जनसूनवणीस तीव्र विरोध असल्याचे महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे आणि जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ आदिंसह मच्छीमार संघटनांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन एका बंद सभागृहात सुनावणी आयोजित करावी किंवा जनजीवन सुरळीत झाल्यानंतरच ही जनसुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.