पालघर/वसई - मागील चार ते पाच दिवसांपासून वैतरणा, चिखलडोंगरी यासह इतर ठिकाणच्या खाडीपात्रात पारदर्शक प्लास्टिक पिशवीसारख्या दिसणाऱ्या जेलिफिश प्रजातीचे मासे आढळत आहेत. हे जेलिफिश मोठ्या प्रमाणावर जाळ्याला लागून येत आहेत. त्यामुळे इतर मासे मिळत नसल्याने मच्छीमार बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे.
खाडीपात्रात जेलिफिश माश्यांचा शिरकाव झाला आहे. तेव्हापासून इतर प्रजातीचे मासे हे खाडीपात्रातून गेले आहेत. याचाच परिणाम हा मच्छीमार बांधवांच्या मासेमारीवर झाला आहे. जेलिफिशमुळे समुद्रात मिळणारे मासे, ज्यावर या बांधवांचा उदरनिर्वाह चालतो तेच मासे कमी प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे नियमितपणे मिळणाऱ्या माशांची आवक घटली असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले. जेलिफिशमुळे नुकसान व त्रास होत असल्याने काही मच्छीमार आता मासेमारीसाठी सुद्धा जात नाहीत.
जेलिफिश घातकच
- सध्याच्या स्थितीत वैतरणा खाडीपात्रात आढळून आलेला जेलिफिश हा 'बॉक्स जेलिफिश' असून हा सुद्धा अतिशय घातक माशांच्या प्रजातीपैकी आहे.
- वातावरणातील बदलामुळे किंवा समुद्राच्या पाण्यात शेवाळ अधिक वाढल्यास जेलिफिशसारख्या प्रजातींची अधिक वाढ होते. हे जेलिफिश इतर छोट्या-छोट्या माशांना खाऊन टाकतात. त्यामुळे याचा जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- जेलिफिशने दंश केल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगर यावरील उत्तम उपाय आहे. दंश झालेल्या ठिकाणी तत्काळ लावल्यास वेदना कमी होऊन आराम मिळतात, असे पालघर येथील प्राणीजीवशास्त्र अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले आहे.
- जिल्ह्यात येत्या काळात प्रकल्प सुरू होतील. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बाहेरून जहाजे येथे येतील. तेव्हा त्यामध्ये असलेले ब्लास्ट वॉटर येथील पाण्यात खाली केले जाईल. त्या पाण्यात असलेले सूक्ष्मजीवही यात येतील. त्यामुळे इतर माशांची पैदास होऊन भविष्यात त्याचा परिणाम स्थानिक मच्छिमारांच्या मासेमारीवर होऊ शकतो, असे प्रा. भोईर यांनी स्पष्ट केले आहे.