पालघर - साईनाथ नगर (विरार पूर्व) येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या शेजारील दोन अनधिकृत पत्र्याच्या दुकानांना आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही आग पेट्रोल पंपाच्या शेजारीच लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण होते. संबंधित घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठा अनर्थ टळला आहे.
विरार पूर्व साईनाथनगर येथे इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपालगतच असलेल्या बंद टायर सर्व्हिसच्या दुकानात आग लागली. दुकानात टायर सोबत रबराचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रूद्र रूप धारण केले. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात असल्याने पेट्रोल पंपाला ही आग लागण्याचा धोका होता.
हेही वाचा वर्ध्यात किराणा मॉलची भीषण आग नियंत्रणात; एका महिलेचा मृत्यू
स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतरही तब्बल एक तास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले नसल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पावणे अकराच्या सुमारास वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल एक एक तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
हेही वाचा चीनमध्ये कारखान्याला आग लागून 19 ठार
आग लागलेल्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तसेच विद्युत तारा असल्याने सुरक्षितेसाठी परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता.
या घटनेत टायर सर्व्हीसचे दुकान व पीयूसी सेंटर असे दोन अनधिकृत गाळे जळून खाक झाले आहेत. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन जवानांनी व्यक्त केला.