विरार(पालघर)- विरार पूर्व चंदनसार येथील 'एचडीआयएल' कंपनीमधील नवनीत कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग संध्याकाळी सातच्या सुमारास लागली आहे. या आगीत कंपनीतील मोठे साहित्य जळून खाक झाले आहे.
विरार पूर्वेतील चंदनसार येथे नवनीत कंपनी आहे. अचानकपणे या कंपनीला आग लागल्याने खळबळ उडाली. कंपनीत वह्या तयार करण्यासाठी लागणारे पेपर व पुठ्ठा असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. आजूबाजूला असलेल्या स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली.
माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आगीत नवनीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग बाजूच्या मोकळ्या मैदानात सुकलेले गवत आणि काही झाडांना लागलेल्या आगीमुळे लागण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.