पालघर - बिडको औद्योगिक वसाहतीमधील गरुडा डायकास्टिंग रासायनिक कारखान्यातील घातक रसायन प्रक्रिया केंद्रात न पाठवता रस्त्यावर फेकून देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी कंपनी मालकासह तिघांवर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईतील वीर भगतसिंग शाळेत ६ वर्षीय मुलीवर अत्याचार; पालकांचा आरोप
बिडको औद्योगिक वसाहतीजवळील दासपाडा येथील काही तरुण कंपनीमधून जात असताना, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका टेम्पोमधील ड्रममधून काही व्यक्ती रसायन बाहेर फेकत असल्याचे त्यांनी पाहिले. तेथे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य नरेश वांगड यांनी टेम्पो थांबवून ग्रामपंचायत सरपंच दीपक करबट, उपसरपंच नरोत्तम राऊत, अपेक्षा मेहेर, पाणेरी बचाव संघर्ष समिती सदस्य आदींनी टेम्पोसह त्यातील लोकांना सातपाटी सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
कारखान्यामधील रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे असलेल्या वेस्ट मॅनेजमेंट प्रकिया केंद्रात पाठवणे आवश्यक असते. मात्र, तरीही कारखानदार आपला खर्च वाचवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ करून अशाप्रकारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, आरोपींची संपत्ती विकून नुकसान भरपाईची मागणी
अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात तारापूर औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्याकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यासह मासेमारी व्यवसाय व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याबाबत याचिका दाखल केली होती. तर, दुसरीकडे पाणेरी बचाव संघर्ष समितीनेही पालघरमधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात लढा सुरू केला आहे. तरीही काही कारखानदार आपल्या कंपनीतील प्रदूषित, रासायने प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्रात न पाठवता छुप्या मार्गाने बाहेर फेकत आहेत.
गरुडा डायकास्टिंग या कारखान्यातील रासायनिक घनकचरा योग्य प्रक्रिया न करता ते रस्त्यावर फेकून मानवी आरोग्यास व त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कंपनीचे मालक मितेश जैन, टेम्पोचालक अमित गिरी (रा.नवली), असिफ अन्सारी, अरुण निसार (रा.बिडको) या चौघांविरोधात सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस अधिक तपास करत आहेत.