पालघर - नालासोपारा आणि वसईमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी आपल्याकडे कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधे उपलब्ध असल्याचा दावा करून त्याबाबतचे फलक नालासोपारा आणि वसईच्या परिसरात लावले होते. अशा दोन डॉक्टरांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुभाषचंद्र यादव व सरवार खान अशी या दोन डॉक्टरांची नावे आहेत.
मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने या डॉक्टरांनी आमच्याकडे कोरोनावर उपाय असल्याचा दावा शहरात बॅनरबाजी करून केला होता. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर पोलिसांनी वसई विरार महापालिका आरोग्य विभाग तथा जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार तुळींज पोलीस ठाण्यात या दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार अफवा पसरवणे आणि जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश भंग केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कोरोनाबाबत कोणत्याही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -
जगभरातील कोरोनासंदर्भातील महत्वाच्या घडामोडी सांगणारे विशेष बुलेटीन