पालघर- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने तत्काळ पंचनामे करण्यातचे आदेश दिले आहेत. मात्र, नुकसान भरपाईचे आदेश देऊनही तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढाला. जिल्हा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी घेऊन हा धडक मोर्चा काढण्यात आला. पालघर येथील हुतात्मास्तंभ ते तहसीलदार कार्यालय अशा निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्ह्यात 75 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. मात्र, परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे सर्वेक्षण करुन पंचनामे करावे.
- हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई विनाविलंब देण्यात यावी.
- नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वर्षभराची खावटी मोफत देण्यात यावे.
या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.