पालघर - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन विरोधात पालघरमधील शेतकरी, आदिवासी, भूमिपूत्र आक्रमक झाले आहेत. बुधवारी पंचायत समिती, पालघर येथे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुलेट ट्रेन संदर्भात जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बुलेट ट्रेन बाधित शेतकरी आणि स्थानिकांनी ही जनसुनावणी उधळून लावली.
हेही वाचा - नात्याला काळिमा.. नालासोपाऱ्यात जन्मदात्या बापाचा ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील 288 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पालघरमधील शेतकऱ्यांना काहीही फायदा नसून शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील हा प्रकल्प सरकारकडून लादला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत पालघरची निधी म्हात्रे देशात प्रथम
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनी संपादित करून मिळणारा कवडीमोल मोबदला ही देखील फसवणूक असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची जमीन बुलेट ट्रेनसाठी संपादित करावयाची आहे, अशा शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देताच ही जनसुनावणी सुरू असल्याने जनसुनावणी ठिकाणी धाव घेत शेतकऱ्यांनी ही जनसुनावणी उधळून लावली. बुलेट ट्रेन विरोधात पालघर मधील शेतकरी आक्रमक असून कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पासाठी जमिनी देणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत.