पालघर - वाडा तालुक्यातील पालसई गावातील शेतकरी किरण गोपाळ पाटील यांच्या भातपीकाच्या वाणाला भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. सुधारीत वाडा कोलम आणि सुधारीत वाडा झीनिया या दोन वाणाचे संशोधन त्यांनी केले आहे. या पीकांचा परवानाही त्यांना देण्यात आला आहे.
किरण पाटील यांच्या कुटुंबाला कृषीक्षेत्राचा ७२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे हे संशोधन भात पीकातील क्रांती मानली जात आहे. वाडा कोलम या वाणाचे उत्पादन पालघर जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून घेत आला आहे. पण, या जुन्या वाडा कोलम वाणाचे उत्पादन काही वर्षांपासून घटत चालले आहे. त्यामुळे किरण पाटील यांनी या वाणाचे सुधारीत वाण विकसीत केले.
किरण यांचे वडील देखील प्रयोगशील शेतकरी होते. वडील गोपाल पाटील आणि काका पद्मन पाटील यांचा तत्कालीन राज्य सरकारच्या उत्कृष्ट भात उत्पादक स्पर्धेत सहभाग घेतल्यानंत 'शेतीनिष्ठ' या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना १९७१ साली मिळाला होता. तसेच, १९७० ला महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाने विक्रमी भात उत्पादन घेतल्यामुळे गौरविले होते.
गोपाल आणि पद्मन पाटील यांनी विविध प्रकारच्या १११ तांदळाच्या प्रजातीवर प्रयोग केले होते. यात आय.आर. ८, बनाल ९ व १, गुजरात ४ व १, रेशमा, पित वर्णी या जाती होत्या. यासाठी तत्कालीन महसुल व अन्नपुरवठा मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी त्यांच्या गौरव केला होता. त्यांचाच वारसा किरण पाटील पुढे चालवत आहेत.
किरण यांनी शेतीकी विषयात शिक्षण घेतले आहे. सन १९९० पासून या भात बियाणांवर विवीध प्रयोग करत त्यांनी शास्त्रज्ञ प्रशांत जोशी (भामोदकर यांच्या मदतीने या संशोधनात सुधारीत वाडा कोलम आणि वाडा झिनीया ही दोन सुधारीत भाताची वाणं विकसीत केली आहेत. आज त्या वाणांना भारत सरकारकडून पेटंट निर्गमित २०/२०१९ ने १७ मे २०१९ ला मिळाला आहे. तर कृषी आयुक्तालय पुणे येथून परवाना सुद्धा मिळविला आहे. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.