पालघर - सामाजिक वनीकरण विभागात मजुरांनी केलेल्या कामाचे दीड वर्षांपासून वेतन नाही. थकीत वेतनाच्या मागणीसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मजुरांनी आदिवासी एकता मित्र मंडळ यांच्या माध्यमातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर वाडा या महामार्गावर टेन येथे सामाजिक वनीकरण विभागाचे स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान केंद्र आहे.
वर्षभराचे वेतन थकले
या उद्यान केंद्रात परिसरातील 30 महिला व पुरूष मजूर या परिसरातील कामासाठी जातात. गेल्या दीड वर्षांचे मजूरवर्गाचे वेतन थकले आहे. थकलेले वेतन मिळविण्यासाठी वनविभागाकडे मागणी-निवेदनेही सादर केली आहेत. मात्र त्यांना अजूनही वेतन मिळत नाही.
वनविभागाकडून दखल नाही
कोरोनाप्रादुर्भाव असताना लॉकडाऊनने बहुतांशी उद्योग ठप्प झाले होते. रोजगाराअभावी नोकरवर्गावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. सामाजिक वनीकरण विभागाच्या केंद्रात काम करणारे मजूरवर्ग कोरोनाकाळात उदरनिर्वाहासाठी आपल्या थकीत वेतनाची मागणी आदिवासी एकता मित्र मंडळच्यावतीने करण्यात आली होती. मात्र यावर अनेकदा तक्रारी करूनही वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
परिवारासह आंदोलन करणार
या वनीकरण विभागात परिसरातील करळगाव, सावरखंड, टेन या भागातील स्थानिक आदिवासी मजूरवर्ग येथे काम करीत आहेत. त्यांचे दीड वर्षापासून वेतन थकले आहे. मजूरवर्ग हा आपल्या परिवारासह लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.