पालघर- राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत या अटीवर कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र, याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अद्याप कुठलाच आदेश न आल्याने जिल्ह्यात सर्वत्र वाईन शॉप बंद आहेत. यामुळे बोईसर मध्ये अगदी सकाळपासूनच वाईन शॉपच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्या तळीरामांच्या पदरी निराशाच आली आहे.
बोईसर येथील काही वाईन शॉप बाहेर भल्या मोठया रांगा लागल्या आहेत. दुकान उघडण्यापूर्वीच अगदी सकाळपासून सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पळत लोक रांगेत उभे आहेत. काही लोक हातात पिशव्या देखील घेऊन आले होते.
वाईन शॉप मालकांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश आल्याशिवाय कोणतेही वाईन शॉप सुरू होणार नाहीत, असे सांगितले तरी लोक रांगेतच उभे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे या रांगेत उभारलेल्या लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.