पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुंगारेश्वर येथे भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जारी केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्रात तुंगारेश्वर मंदिर आणि परिसरात भाविक, पर्यटकांना बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधित बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांना आणि पर्यटकांना येथे येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - COVID-19 : मुंबईत 1 हजार 311 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 2 हजार 420 रुग्णांची कोरोनावर मात
सोमवारी ६ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. या एक महिन्यात सुरुवातीचे पंधरा दिवस हिंदी भाषकांचा श्रावण असतो. तसेच त्यानंतर मराठी भाषिकांचा श्रावण असतो. दरवर्षी या महिन्यात तुंगारेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना याठिकाणी दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. या बंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.