पालघर : श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाच्या ( Shraddha Murder Case ) तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी वसईत तपास ( Delhi Police investigation ) केला. शनिवारी पोलिसांनी श्रध्दाचे मित्र आणि सहकारी अशा ४ जणांचे जबाब नोंदवले. श्रध्दाला २०२० मध्ये आफताबने केलेल्या मारहाणी संदर्भातही चौकशी करण्यात आली.
चार जणांचे जबाब नोंदवले - वसईतील तरुणी श्रध्दा वालकर हिच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी वसईत दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी विविध ठिकाणी चौकशी करून तपास सुरू केला आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी श्रध्दाचा मित्र गॉडविन राॅड्रीग्ज, राहुल राॅय, शिवानी म्हात्रे तसेच श्रध्दा मुंबईत ज्या कॉल सेंटर मध्ये काम करायची तेथील व्यवस्थापक करण बहरी यांची चौकशी करून जबाब नोंदवला. आफताब याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
श्रद्धाल मारहाण करत होता आफताब - श्रध्दा आणि आफताब २०२० मध्ये वसईच्या रिगल अपार्टमेंट मध्ये भाड्याचा सदनिकेत रहात होते. या काळात आफताब तिला मारहाण करत होता. डिसेंबर महिन्यात त्याने श्रध्दाला बेदम मारहाण केली. श्रध्दाचा मित्र गॉडविन रॉड्रीक्स आणि राहुल राय याच्या मदतीने ती वसईच्या एव्हरशाईन येथील ओझॉन रुग्णालयात दाखल झाली होती. या मारहाणीत तिच्या चेहर्यावर, मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात दिलेला अर्ज तुळींज पोलिसांनी सापडला असून तो दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. त्यात तिने आफताबने मारहाण केल्याचे सांगून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. पण श्रद्धाने ही तक्रार आठ दिवसांनी परत घेतली असल्यामुळे तपासी अंमलदाराने दोघांचे जबाब नोंदवत तक्रार निकाली काढली होती.