पालघर: डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या तलासरी तालूक्यातील झाई आश्रम शाळेतील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आश्रमशाळेतच अचानक मृत्यू झाला. विद्यार्थिनी सरिता भरत निमला, (रा.झरी डोलारपाडा,वय १० वर्ष) हीने सकाळी आश्रमशाळेत नाष्टा केला. त्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. शाळा प्रशासनाने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र तिचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. झाई येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येते.
या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसापासून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाचे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे व आरोग्य तपासणी व औषधोपचाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. शासनाच्या नियमानुसार शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचारही वेळेत होणे आपेक्षित आहे. परंतु बऱ्याच शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची वेळेत आरोग्य तपासणी व उपचार होत नसल्यामुळे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
सारिका या विद्यार्थीनीचा मृत्यू कशामुळे झाला? असा प्रश्न पालकांना पडला असुन एक प्रकारे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी आसीमा मित्तल यांनी दिली आहे. या घटनेनंतर आश्रम शाळेतील 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून आजारी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थिनी सारिका भरत निमला हिचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा पुढील तपास घोलवड पोलीस करीत आहेत .झाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनीच्या अचानक मृत्यू मूळे शाळाप्रशासन हादरलेले दिसत आहे.