नालासोपारा (पालघर) - नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या फळ आणि भाजी मंडईत फेरीवाले विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांची खुलेआम लूट करत आहेत. हा प्रकार ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जादाचे पैसा कमवता यावे, यासाठी काही विक्रेते चक्क मोजमाप करणाऱ्या काट्याखाली दगड ठेवत असून ग्राहकांना लुबाडण्याचे काम करत आहेत. मापात पाप करणारा हा गोरखधंदा नेमका कसा आहे, यबाबतीत 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांकडून ग्राहकांची लूट नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात फळ आणि भाजी मंडई आहे. या जागेवर दररोज शेकडो फेरीवाले व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर ठेला लावत असतात. मात्र, हे फेरीवाले वजनाऐवजी दगड ठेवून वजन करून भाजी आणि फळांची विक्री करत आहेत. गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा परवडणारा बाजार असल्याने मोठ्या संख्येने ग्राहक या बाजारातून खरेदी करीत असतात. मात्र, इथे असलेल्या मुजोर व बेईमान फेरीवाले स्वतःचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.प्रत्येक वजन काट्याचे वैधमापन अधिकाऱ्यांकडून प्रमाणबद्ध केले जाते. मात्र, सुरू असलेल्या गोरखधंद्यात वैधमापन वसई तालुक्यात अस्तित्वात आहे की नाही? याची शंका उपस्थित केली जात आहे. शिवाय हे मुजोर फेरीवाले वजनावरून एखाद्या ग्राहकाने हुज्जत घातली तर अरेरावी करून त्यांच्यांवर दादागिरी करत असल्याचा तक्रारी ग्राहकांमधून केल्या जात आहेत. त्यामुळे खुलेआम जनतेची केली जाणारी लूट प्रशासनाने थांबवावी ही मागणी नागरिकांमधून केली जात आहे.जनतेची होणारी रोजची लूट 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून उघडकीस आली आहे. बेईमान फेरीवाल्यांच्या या गोरखधंद्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांवर गदा येत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या या चोरीवर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा - पर्यावरणप्रेमींसाठी खुशखबर.. आरेमधील मेट्रो -3 चे कारशेड आता कांजुरला होणार; सात वर्षांच्या लढ्याला यश