वसई (पालघर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छटपूजा पर्व साजरे करण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असतानाही शुक्रवारी विरार फुलपाडा येथील पापडखिंड धरणाच्या काठावर छट पुजेसाठी जाण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मात्र या भाविकांना रोखत पोलिसांनी त्यांना पुन्हा माघारी पाठवले. मात्र या दरम्यान पोलीस आणि काही नागरिकांमध्ये वाद देखील झाला.
वसई, विरारमध्ये कामानिमित्त बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहेत. दरवर्षी हे नागरिक छटपूजेच्या दिवशी समुद्रकिनारे आणि तलावाच्या काठावर एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. मात्र यंदा कोरोनामुळे सार्वजनिकरित्या छटपूजा साजरी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरी देखील काही नागरिक पूजेसाठी पापडखिंड धरणाच्या काठावर एकत्र जमले होते. पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांनी या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला, व त्यांना घरी जाण्यासाठी सांगितले. मात्र या दरम्यान पोलीस आणि तिथे उपस्थित काही नागरिकांमध्ये वाद झाला. मात्र पोलिसांनी या भाविकांची समजूत काढत त्यांना आपल्या घरी पाठवून दिले.