पालघर - वसई मालजीपाडा येथे गावठी दारू तयार करणाऱ्यांवर वालीव पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पूर्वेकडील मालजीपाडा गावाच्या हद्दीत खाडीतील बेटावर हातभट्टी लावण्यात आली होती. भरत राऊत ही व्यक्ती या ठिकाणी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती वालीव पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून गावठी हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा नवसागर मिश्रीत गुळाचा वॉश व दारू तसेच ती तयार करण्याची साधने असा एकूण 1 लाख 11 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी मात्र पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला. त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वालीव पोलीस करत आहेत.