पालघर - नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी हुतात्मा दिनी फोटो काढताना सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडवल्याचे चित्र पहावयास मिळाले. हेच लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतात. मात्र, त्यांनीच नियम पायदळी तुडवल्याने सोशल मीडियावर टीका होत आहे.
14 ऑगस्ट पालघरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी हुतात्मा स्तंभ येथे 'चले जाव'च्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या पालघरच्या पाच विरपुत्रांना आदरांजली वाहिली जाते. सुरक्षित अंतराचे पालन करत हुतात्म्यांना वंदन करण्यात आले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यक्रम स्थळावरून निघून जाताच फोटो काढताना नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय नेते यांनी सुरक्षित अंतराच्या नियमांचा पार फज्जा उडवल्याचे चित्र दिसले. एकीकडे लोकप्रतिनिधी नागरिकांना नियम व अटींचे पालन करा, असे सांगतात. मात्र, दुसरीकडे फोटो काढण्यात मग्न नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नगरसेवक, पदाधिकारी व राजकीय नेत्यांना सुरक्षित अंतर पाळले नसल्याचे दिसून आले.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत पालघर नगरपरिषद क्षेत्रामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन करणाऱ्या नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीच नियमांची पायमल्ली केल्याने नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत आहे.