पालघर - शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायम स्वरूपी बंदी घातलेली आहे. तरीही अनेक व्यापारी, दुकानदार त्याचा सर्रास वापर करताना दिसत आहे. अशाप्रकारे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नालासोपारा परिसरात महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान, 1 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करून 10 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
महानगर पालिकेमार्फत व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांना सदर बंदीबाबत कल्पना देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणेबाबत सूचना केलेल्या आहेत. असे असताना देखील शहरातील कित्येक व्यापारी, दुकानदार, फेरीवाले सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल वापरत असल्याने पालिकेने त्यांच्यावर जप्ती व दंडात्मक कारवाई सुरू केली होती. मध्यंतरीच्या काळात कारवाई थंडावली होती. परंतु, कोव्हीड-19 च्या काळात शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्या सूचनेनुसार पुन्हा प्लास्टिक पिशव्या जप्ती मोहीम सुरू केली असून नालासोपारा प्रभाग समिती ’ब’मधील व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
बंदी असतानादेखील वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा येतो कोठून? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होतो.