पालघर - डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटीलपाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम निकृष्ट झाल्याचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रसारीत ( ETV Bharat News ) केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित बांधकाम पाडून नवे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका टळला असून, ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले ( Construction of Zilla Parishad school Resumes at Chinchani ) आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. यादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीअभावी अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. त्यातच चिंचणी येथे ठेकेदाराकडून सुरू असलेले शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. सन् 2020-2021 या आर्थिक वर्षात डीपीसीअंतर्गत मंजूर झालेल्या या कामाची वर्कऑर्डर फेब्रुवारी 2022 मध्ये झाली. या बांधकामासाठी तब्बल 9 लाख 65 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या बांधकामासाठी रेती, सिमेंट इत्यादी साहित्य योग्य प्रमाणात न वापरल्याने इमारतीचे पिलर हलत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. लाखो रुपये खर्चूनही निकृष्ट बांधकाम करण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. परिणामी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने सर्वप्रथम वृत्त प्रसारीत केले होते.
शाळा बांधकामाचे वृत्त प्रसारीत होताच प्रशासनाला जाग आली. समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता सचिन शिंदे, कनिष्ठ अभियंता सपताले आणि जिल्हा परिषद सदस्य शिंगडे यांनी शाळेला तातडीने भेट दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदाराने आधीचे कच्चे बांधकाम पाडून नवे बांधकाम केले. तसेच, उर्वरित बांधकाम 20 दिवसांत पूर्ण करून देण्याची हमी दिली. दरम्यान, सद्यःस्थितीत शाळेचे बांधकाम समाधानकारक असल्याचे पत्र ग्रामपंचायत सदस्य नितेश दुबळा, अनिल राऊत, सुहास राऊत, गणेश धोडी, दिनेश बारी, सुशेंद्र सापे यांनी समग्र शिक्षा अभियानाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
शाळा दुरुस्तीचे काम योग्यप्रकारे करण्यासंदर्भात ठेकेदाराला सूचना करण्यात आली. त्यानुसार सद्यःस्थितीत केले जाणारे काम समाधानकारक आहे. प्रशासनाकडून या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता सपताळे यांनी दिली.
'ईटीव्ही भारत'च्या वृत्तामुळे शाळेचे कच्चे बांधकाम पाडून चांगले बांधकाम केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीविताचा संभाव्य धोका टळला आहे. ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. शाळा दुरुस्तीचे संपूर्ण काम विनाविलंब आणि योग्यप्रकारे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य नितेश दुबळा यांनी दिली आहे.
हेही वाचा - ZP School Bogus Construction : जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे; गावकऱ्यांनी केली पोलखोल