पालघर - राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान हा केंद्र सरकारचा विषय असून पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी केंद्राकडून मदत मागता या भाजपच्या आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्ला चढवला. राज्यातील विरोधी पक्षाला राष्ट्रीय आपदा काय? याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचा सल्ला नाना पटोले यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले आणि मंत्री अस्लम शेख यांनी पालघरमधील पश्चिम किनारपट्टीची पाहणी केली.
'केरळपासून अगदी गुजरातपर्यंत चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करून गुजरातलाच मदत जाहीर करतात. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिल्याचा' आरोप नाना पटोले यांनी केला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी ते बोलत होते. तसेच नुकसान झालेल्या मच्छिमार तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना तातडीने मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
लस तुटवड्याला केंद्र सरकार कारणीभूत -
कोरोना लसीकरणाबाबत देशात जाणवत असलेल्या तुटवड्याला केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. इतर देशांना लसींचा पुरवठा केल्याने आता भारतात लसी शिल्लक नाही. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला देखील मोफत लस देण्यात आली. त्यामुळे हे सरकार पाकिस्तान धार्जिने असल्याचा आरोपही त्यांनी केला.