पालघर - राज्यात सत्ता वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये एकीकडे घमासान सुरू असताना, दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ यांनी 'भाजप मुक्त पालघर जिल्हा' तसेच, 'भाजपमुक्त पालघर जिल्ह्याचे शिल्पकार' असा मजकूर असलेले उपहासात्मक फलक सरावली, पास्थळ, खैरा पाडा, सालवड अशा ठिकाणी लावले होते. या फलकांमध्ये भाजपचे राष्ट्रीय चिन्ह कमळ हे उलटे दाखवले गेले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय चिन्हाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच, अब्रूनुकसानी केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात सुमारे दोन तास घेराव घातला. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोईसर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ यांच्यासह दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फलक छापून देणाऱ्याचाही समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला 3 जागा, माकपकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 तर शिवसेनेकडे 1 असे राजकीय बलाबल झाले असून भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. आमदार विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सावरा व पास्कल धनारे हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले, आणि पालघर जिल्ह्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. याच पार्श्वभूमीवर हे फलक लावण्यात आले होते.
मात्र, एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा अवमान ही खरंच गुन्हा दाखल करण्याजोगी बाब आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा : आधार कार्ड बनवण्यासाठी किती येतो खर्च? सरकारलाही नाही माहिती..