पालघर - वसईच्या भूमी अभिलेख कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात सात जानेवारीला आगरी नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याने वसईत खळबळ माजली आहे.
हेही वाचा - जाळ्यात अडकलेल्या फिनलेस पॉरपॉईझ माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी सुरू असणाऱ्या भूमी संपादन प्रक्रियेसाठी जुना सर्व्हे नंबर 187, हिस्सा नंबर 3 चा उपविभाग 1 क्षेत्र 1.01.90 व जुना सर्व्हे नंबर 187, हिस्सा नंबर 3 चा उपविभाग 2 क्षेत्र 0.64.00 या सामाईक भूखंडाची मोजणी भाताने येथील संदेश पांडुरंग जाधव व त्यांच्या भावांच्या हिताच्या दृष्टीने करावी याकरिता आगरी नेते कैलास पाटील व इतर दोघे 10 डिसेंबरला दुपारी वसईच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात आले होते. त्यावेळी शासकीय कर्तव्यावर असलेले विजय कृष्णा धुमाळ (वय 43) यांच्या टेबलजवळ जाऊन पाटील यांनी सदर जागेची मोजणी करून त्याचा अहवाल का पाठवला नाही, असे बोलून धुमाळ यांना शिवीगाळ केली व धिंगाणा करून मोजणी प्रकरणांच्या फायली धुमाळ यांच्या अंगावर फेकून त्यांना नागडे केले.
धुमाळ यांना ठार करण्याची धमकी
तसेच, धुमाळ यांना दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देत, अहवाल व्यवस्थित पाठवला नाही तर बघून घेण्याचीही धमकी दिली. दोन वर्षापूर्वी प्रभाग समिती 'क' चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस व बांधकाम अभियंता आर.के. पाटील यांना दिवाणमान येथील एका प्रकरणात गैर कायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिवीगाळ प्रकाराच्या विरोधात महापालिकेच्या तब्बल दीड हजार कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन देखील केले होते. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल सदर कर्मचाऱ्याने वसई पोलीस स्टेशन येथे दखलपात्र गुन्ह्याची नोंद केलेली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'धूम स्टाईल' बेततेय जीवावर; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोघांचा मृत्यू