पालघर /विरार - वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण, विलगीकरण केंद्र व कोविड रुग्णालये उभारली आहेत. तसेच शहरातील काही खाजगी रुग्णालयातील ठराविक बेड अधिग्रहित करून कोरोनाबाधित रुग्णांवर महानगरपालिके मार्फत उपचार केले जात आहेत.
या केंद्रामध्ये व रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचार व सेवा देणे कामी नियुक्त करण्यात आलेला महानगरपालिकेचा डॉक्टरवर्ग अपुरा पडत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१४ मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार आयुक्त यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून शहरातील खाजगी डॉक्टरांना महानगरपालिकेच्या अलगीकरण, विलगीकरण केंद्रांमध्ये व रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचार व सेवा देण्यासाठी अधिग्रहित केलेले आहे. तसे आदेशही संबंधितांना वेळोवेळी बजावण्यात आलेले आहेत. परंतु तरीही काही खासगी डॉक्टर रुग्णांना उपचार व सेवा देणे कामी अनुपस्थित राहिले असल्याचे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.
अधिग्रहित केलेले खाजगी डॉक्टर सेवा देणे कामी हजर झाले नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होत असून उपलब्ध वैद्यकीय सेवेवर याचा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना उपचार व सेवा देणे कामी अनुपस्थित राहिलेल्या बेजबाबदार डॉक्टरांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागास दिले आहेत.