पालघर- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीत मास्क न घातल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांना मास्क न घालणे महागात पडले आहे. मास्क न वापरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कामडी यांच्याकडून २०० रुपयांचा दंड आकरला त्यानंतर त्यांना नवीन मास्क देण्यात आला.
"नो मास्क, नो एन्ट्री” नियमाची अंमलबजावणी
शिवसेनेच्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्यासमोर आसनस्थ होत असताना त्यांच्याकडे मास्क नसल्याचे निदर्शनास आले. "नो मास्क, नो एन्ट्री” या राज्य सरकारच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणे गुन्हा असल्याने त्यांच्यावर २०० रुपयाची दंडात्मक कारवाई करून त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला.
सरकारी प्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन:-
एका बाजूला सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी अनेक कडक नियमांची अंमलबाजावणीही करण्यात आली आहे, मात्र सरकारमधील पदाधिकारीच शासनाचे नियम पायदळी तुडवत असतानाचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे पालघरमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत:-
राज्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवास करताना तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना देखील अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठ तसेच आठवडा बाजारमध्येदेखील नागरिक मास्क घालण्याबद्दल उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल असे संकेत पालघर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत