पालघर - कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. अशा काळात काही लोक अफवा पसरवत आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोर, दरोडेखोर, किडन्या काढणारे येत असल्याचा अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काही गावात अंधार पडला, की मुख्य रस्त्यांवर जमाव तयार होतात आणि येणाऱ्या वाहनांना थांबून प्रवाशांना मारहाण करण्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. गेल्या ४ दिवसात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. गुरुवारी रात्री गडचिंचले येथे जमावाने तीन प्रवाशांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, व कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ नये असे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
दादरा-नगर-हवेलीच्या हद्दीवर असलेले दाभाडी-खानवेल रोडवरील गडचिंचले येथील गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कांदिवली येथून सुरतकडे जाणाऱ्या इको कारला अडवले. त्यामधील तिघांना कोयत्या, कुऱ्हाडी आणि दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. कासा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रवाशांना त्यांच्या गाडीतून काढून पोलिसांच्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला, पोलिसांनी आपली सुटका करून घेतली. मात्र पोलिसांच्या गाडीतच असलेल्या प्रवाशांची जमावाने दगड काठ्यांनी मारून निर्घृण हत्या केली.
हा संपूर्ण जंगलाचा परिसर असून कासा पोलिसांनी, आतापर्यंत ११० जणांना ताब्यात घेतले आहे. काही हल्लेखोर जंगलात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेत मृत झालेल्या तिघांचेही मृतदेह तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तोडफोड झालेल्या गाड्या कासा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असून हे प्रवासी कुठून व कसे आले? तसेच याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.