पालघर - विरारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक चोरटा एका इमारतीत चोरीच्या हेतुने शिरला. चोरी करताना रंगेहाथ पकडला गेल्यानंतर त्याने निमूटपणे स्वत:ला सोसायटीतील नागरिकांच्या स्वाधीन न होता त्यांना प्रतिकार केला. इतकेच नव्हे तर या चोराने सोसायटीतील नागरिकांनाच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोसायटीतील इतर नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नेमकं काय घडलं?
विरारच्या देवकृपा अपार्टमेंटमधील मकवाना कॉम्प्लेक्स या इमारतीत संबंधित प्रकार घडला. संबंधित प्रकार रात्री उशिरा एक ते दोन वाजेच्या सुमारास घडला. एक चोरटा बिल्डिंगमध्ये घुसला आणि चोरी करू लागला. तेवढ्यात बिल्डींगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला पकडलं आणि त्याची विचारपूस केली. तेथील लोक या चोरट्याला विचारत असताना चोरट्याने त्यांना मारहाण केली. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने कबड्डी स्टाईलमध्ये दोघांवर हल्ला केला. अखेर सोसायटीतील इतर नागरिकांच्या मदतीने चोरटा पकडला गेला.
हेही वाचा - अमरावती : तिवसा शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या; दोन जणांच्या हत्येचा होता आरोप
चोराजवळ दुबईचं पासपोर्ट -
या चोरट्याच्या खिशातून दुबईचा पासपोर्ट मिळाले आहे. तसेच त्याच्याजवळ केरळचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील मिळाले आहे. हा चोरटा दारूच्या नशेत होता. सोसायटीतील नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सोसायटीतील नागरिकांमध्ये चोरांबद्दल धास्ती निर्माण झाली आहे.